
न्यूज जागर|प्रतिनिधी
मुंबई : भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाश आंबिटकर यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विविध आरोग्य समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करत निवेदन सादर केले.
भेटीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, आरोग्य केंद्रांतील सुविधा तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. माजी आमदार डॉ. होळी यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते. आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी मांडण्यात आलेल्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित बाबींची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी हा पाठपुरावा सुरू असल्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले.

