
प्रतिनिधी : न्यूज जागर
चामोर्शी, दि. २३ जून : तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या अनखोडा ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्या कथित गैरहजेरीमुळे शेतकरी, नागरिक, विद्यार्थी आणि विविध शासकीय योजनांचे लाभार्थी त्रस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास अधिकारी आठ-आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे. त्यामुळे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जन्म-मृत्यू नोंदी, विविध प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे अर्ज, कर भरणा, मनरेगा व इतर विकासकामांशी संबंधित अनेक कामे रखडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ग्रामपंचायत ऑपरेटर हे देखील बाहेरगावचे असल्याने ते आठ ते दहा दिवस कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी ऑनलाइन सेवा, शासनाच्या विविध पोर्टलवरील नोंदी, प्रमाणपत्रांची प्रक्रिया आणि इतर संगणकीय कामे ठप्प होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या खरीप हंगामाची धावपळ सुरू असून शेतकऱ्यांना विविध योजनांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे, अनुदानासाठी लागणारे दाखले आदी कामांसाठी ग्रामपंचायतीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या संदर्भात प्रतिनिधीने ग्रामसेवक धानोरकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “माझ्याकडे ग्रामपंचायत कोणसरी कार्यालयाचा नियमित कार्यभार असून ग्रामपंचायत अनखोडा येथील अतिरिक्त प्रभारदेखील आहे. त्यामुळे मी दररोज सकाळी कार्यालयीन वेळेत अनखोडा येथे सुमारे दोन ते तीन तास उपस्थित राहून तेथील प्रशासकीय कामकाज पार पाडत असतो. त्यानंतर उर्वरित वेळेत ग्रामपंचायत कोणसरी येथे उपस्थित राहून नियमित कामकाज व नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करत असतो. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीबाबत गैरसमज निर्माण होऊ नयेत.”
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालय नियमित सुरू राहणे आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन ग्रामविकास अधिकारी व ऑपरेटर यांच्या उपस्थितीची चौकशी करावी, कार्यालयीन कामकाज नियमित करावे आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच, नागरिकांना मूलभूत शासकीय सेवा वेळेत मिळाल्या नाहीत तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकारी याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण अनखोडा गावाचे लक्ष लागले आहे.

