
– मतदार यादीतील त्रुटी निवारणासाठी 7 दिवसांची मुदतवाढ
गडचिरोली – गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग रचनेनुसार मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारींवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे करण्यात आलेल्या मागणीला अखेर प्रशासनाने मान्यता दिली असून मतदार यादीतील हरकती व त्रुटी निवारणासाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या संदर्भात परिषदेच्या वतीने मा. मुख्याधिकारी, गडचिरोली नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले होते.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनातं उमेश उईके (जिल्हा महासचिव), पुष्पलता कुमरे (महिला जिल्हाध्यक्षा), विद्या दुग्गा (महिला जिल्हा सचिव), सुरज मडावी (जिल्हा सचिव), अमित तलांडे, पुष्पा कुमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
परिषदेने निवेदनात नमूद केले होते की, अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाली असून काही प्रभागांतील मतदारसंख्या आणि यादीतील आकडेवारीत विसंगती आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मागणीची प्रशासनाने दखल घेत हरकती व त्रुटी निवारणासाठी 7 दिवसांची अतिरिक्त मुदत जाहीर केली. या निर्णयामुळे अनेक नागरिकांना आपली नावे व प्रभागातील चुका दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध झाली असून, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पुढाकाराचे शहरात स्वागत होत आहे.

