
अमरावती – गावातील नागरिकांनी एकत्र येत दोन किलोमीटरचा पाणंद रस्ता मोकळा केला आहे. याचप्रकारे नागरिकांनी सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सक्रिय सहभा नोंदवावा.या सेवा पंधरवड्यात पांदण रस्ते, घरकुल यांची कामे घेऊन गाव तंटामुक्त करावेत, असे आवाहन जिल्हाधिकार आशिष येरेकर यांनी केले.
वडगाव माहोरे येथे सेवा पंधरवड्यानिमित्त पांदण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचा उपक्रम पार पडला. यावेळी सरपंच मालाताई माहोरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, भूमी अभिलेखचे अधिक्षक महेश शिंदे, तहसिलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी श्री. गुल्हाणे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मदन पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, प्रत्येक गावात पांदण रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रामुख्याने पेरणीच्या कालावधीत रस्त्यांबाबत समस्या समोर येतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अस्तित्वात असलेले रस्ते मोकळे करणे आणि नकाशावर नसलेले परंतु वहिवाटीत असलेले रस्ते नकाशावर घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या रस्त्यांवर परत अतिक्रमण होऊ नये, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येत आहे.
पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा. अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त महसुली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. तसेच गावातील इतर तंट्यांमुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. प्रामुख्याने शेतातील रस्त्यांबाबत समोपचाराने मार्ग काढावा. सेवा पंधरवड्यात घरकुलाची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. गावठानातील अतिक्रमण असलेल्यांना 500 चौरस फुट जागा देण्यात येईल, तसेच गावालगतच्या इतर जमिनींवर प्रकल्प राबवून 500 चौरस फुटाची जागा वाटप करावी. यामुळे सर्वांसाठी घरे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होईल. कार्यक्रमात पांदण रस्त्यांसाठी गावातील नागरिकांनी सहमतीपत्र जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांना सुपूर्द केले. यावेळी पांदण रस्त्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भटकर यांनी बैलगाडीत बसून गावातील नागरिकांसह पांदण रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर वृक्षारोपण केले. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पांदण रस्त्यासाठी सहा गुंठे जमीन दिली असल्याचे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले


