
गडचिरोली : जिल्ह्यातील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम हे शासनाने पूर्वी निश्चित केलेल्या आणि अधिकृतरित्या मंजूर केलेल्या जागेतच करण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्र सेवा दल, छात्र भारती व आदिवासी सुशिक्षित बेरोजगार संघटना यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्य सरकारने अधिकृतपणे मंजूर झालेल्या जागेवरच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, अलीकडे जागा बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत असून त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे तसेच डॉ. होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांचे, जिल्ह्यातील नागरिकांचे नुकसान होऊ शकते.
या बांधकामासाठी आधीच सर्व प्रक्रिया पूर्ण करून जागा निश्चित करण्यात आली असल्याने तीच जागा कायम ठेवावी आणि या प्रकल्पास गती द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच सदर मंजूर जागा ही जिल्हा रुग्णालयाला लागून असल्यामुळे रुग्णांना ये-जा करणे सोयीस्कर ठरेल, तसेच विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष प्रशिक्षण व क्लिनिकल कामासाठी सहज पोहोच मिळेल. ही सोय इतर पर्यायी जागांवर मिळणे कठीण असल्याचेही संघटनांनी स्पष्ट केले आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, मंजूर जागेवर बांधकाम झाले नाही तर भविष्यात या महाविद्यालयाच्या जागेअभावी प्रकल्प रद्द होण्याची किंवा तोकड्या स्वरूपात थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा यांचे मोठे नुकसान होईल.
यावेळी निवेदन देताना राष्ट्र सेवा दल व छात्र भारती विध्यार्थी संघटनेचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेश उईके, आदिवासी सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्र सेवा दल चे राज्य कार्यकारणी सदस्य सुरज मडावी, वनिशाम येरमे, पुष्पलता कुमरे, विद्या दुग्गा, आरती कोल्हे, आरती कंगाले, शारदा मडावी, शामला घोडाम, रेखा तोडसे, रोहिणी मसराम, माधुरी पतोडी, प्रीती बारसागडे आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

