
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना व युवकांचा शिष्टमंडळ माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेतली. या भेटीत तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्यसेवा व शिक्षणातील अडचणी, जंगलातील आदिवासी वस्तीपर्यंत पोहचणाऱ्या मूलभूत सुविधा यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळाने सांगितले की, खडबडीत रस्तेमुळे रुग्णवाहिका व शालेय वाहतूक यावर मोठा परिणाम होतो आहे. तसेच आदिवासी भागात आरोग्य केंद्रांची कमतरता, प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे, वीज पुरवठ्यातील अनियमितता व युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधींचा अभाव यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
या सर्व मागण्यांचे एकत्रित निवेदन शिष्टमंडळाने डॉ. होळी यांना सादर केले. डॉ. होळी यांनी या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते शासनस्तरावर पाठपुरावा करतील.

शिष्टमंडळात प्रसाद पुल्लरवर, निर्मला नल्लावर, विजय नल्लावर, सुरेखा मुत्तमवार, पवन फुलके आदी नागरिक सहभागी होते. नागरिकांनी या भेटीमुळे आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

