
चामोर्शी, दि. १९ ऑक्टोबर : शहरासह परिसरात हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात चामोर्शी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी १ लाख १८ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल शोधून काढले असून, १९ ऑक्टोबर रोजी ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार आणि प्रकाश गडकर यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
पथकाने CEIR पोर्टलवर मोबाईलचे IMEI क्रमांक नोंदवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. अखेर आठही मोबाईल हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले आहे.

