
छुप्या कप्प्यांतून ४०० देशी दारूच्या निपा जप्त; गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई, २.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

गडचिरोली | प्रतिनिधी
अवैध दारू वाहतुकीसाठी तस्करांनी चक्क दुचाकीच्या पेट्रोल टँक आणि सीटमध्ये छुप्या जागा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ नाकाबंदीदरम्यान गडचिरोली पोलिसांनी दोन दुचाकींची तपासणी केली असता, त्यामध्ये लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या तब्बल ४०० निपा आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकींसह एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तस्करीसाठी दुचाकीतच बनवले छुपे कप्पे!
अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांनी पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी दुचाकीच्या पेट्रोल टँक व सीटमध्ये छुप्या जागा तयार केल्याचे तपासणीत समोर आले. या कप्प्यांमध्ये देशी दारूच्या निपा लपवून वाहतूक केली जात होती. मात्र, पोलिसांच्या नाकाबंदीमुळे ही शक्कल उघडकीस आली आणि अवैध दारू वाहतुकीचा प्रकार समोर आला.
२४ तास नाकाबंदी; अवैध धंद्यांवर पोलिसांचा वॉच!
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमांवर पोलिसांकडून २४ तास नाकाबंदी करण्यात येत असून, अवैध दारू वाहतूक आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. वैनगंगा नदीजवळ करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दुचाकीत कितीही छुपे कप्पे तयार केले, तरी कायद्याच्या नजरेतून सुटका नाही! अवैध दारू वाहतुकीविरोधातील गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे की, बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची नजर कायम आहे.

