
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : जैरामपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक व विकासकामांच्या हिशोबाची माहिती मागण्यात आली आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन योग्य ती चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांतील कामकाजाचा व खर्चाचा हिशोब नागरिकांनी मागितला. मात्र, मागितलेल्या माहितीबाबत समाधानकारक स्पष्टता मिळाली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात यावी आणि ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून, संबंधित बाबींची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,” अशी मागणी वैभव गौरकार यांचेसह निवेदनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पंचायत समिती प्रशासनाकडून चौकशी झाल्यास जैरामपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतची वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

