
भोगनबोडी हेट्टीत अतिक्रमणाला अभय? ग्रामस्थांचा संतप्त सवाल; तातडीने कारवाईची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत येणाऱ्या भोगनबोडी हेट्टी गावातील शासकीय सभागृहाच्या प्रवेशमार्गासमोर काही नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या सभागृहाचा प्रवेशमार्गच अडथळ्यांनी व्यापला गेल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून, या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
गावातील शासकीय, सामाजिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा वापर केला जातो. मात्र, सभागृहासमोरील प्रवेशमार्ग अतिक्रमणामुळे अरुंद झाल्याने कार्यक्रमांच्या वेळी नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्दीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होत असताना प्रशासनाचे मौन का? असा थेट सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. अतिक्रमणाची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करणे अपेक्षित असतानाही अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सभागृहाचा प्रवेशमार्ग सर्वांसाठी खुला आणि मोकळा असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या अडथळे निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी आणि नियमबाह्य अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अतिक्रमण हटणार की ‘मौन’ कायम राहणार?
ग्रामपंचायत मारोडाने शासकीय सभागृहाचा प्रवेशमार्ग तातडीने मोकळा करावा, अतिक्रमणाची अधिकृत पाहणी करावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात सार्वजनिक जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘सार्वजनिक सुविधेचा मार्ग अडवला जात असताना ग्रामपंचायत प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे?’ हा प्रश्न सध्या भोगनबोडी हेट्टी गावात चर्चेचा विषय ठरत असून, प्रशासन आता या प्रकरणी काय भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया: समाज भवनाच्या जागेवर ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे.त्याला आमसभा घेऊन कारवाईचे नोटीसही देण्यात आले.तरीही त्या व्यक्तीने अतिक्रमण हटविले नाही.आता कठोर कारवाई त्याचेवर करण्यात येईल.
– ग्रामसेवक हरडे मारोडा.

