
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करावा. अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक आणि संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी केले.

पारबताबाई विद्यालय, कोरची आणि पोलीस स्टेशन, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनल बल्लाळ आणि पोलीस हवालदार नाजिया शेख यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, महिला अत्याचार प्रतिबंध, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि शालेय सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
गुगल, ई-मेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, अपरिचित व्यक्तींशी संपर्क साधणे, पासवर्ड अथवा ओटीपी शेअर करणे यामुळे सायबर फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात गुड टच-बॅड टच, महिला सुरक्षा, सायबर कायदे व नियम आणि शालेय सुरक्षा या विषयांवरही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गुरनुले यांनी केले, तर आभार शिक्षक चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

