
नवीन इमारत लवकरात लवकर आरोग्यसेवेसाठी कार्यान्वित करण्याचे निर्देश; कामाची प्रत्यक्ष पाहणी करून घेतला सविस्तर आढावा
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील महिला आणि बालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या आरोग्य प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणेशी चर्चा केली.

यावेळी बांधकामाची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती घेण्यात आली. कामामध्ये कोणताही अनावश्यक विलंब खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करत आमदार डॉ. नरोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला आवश्यक ती गती देण्याच्या सूचना दिल्या.
नवीन इमारतीचे उर्वरित बांधकाम तातडीने पूर्ण करून ती लवकरात लवकर हस्तांतरित करावी आणि प्रत्यक्ष आरोग्यसेवेसाठी कार्यान्वित करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
महिला व बालकांना उपचारासाठी अत्याधुनिक व सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे विशेष लक्ष देण्यात येत असून, रुग्णालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील महिला व बालकांना अधिक दर्जेदार आणि सुविधायुक्त आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
“महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रकल्प असून, कामात दिरंगाई न करता आवश्यक त्या गतीने उर्वरित कामे पूर्ण करून रुग्णालय सेवेत आणावे,” अशा स्पष्ट सूचना आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिल्या.

