
मूर्तिकारांची धावपळ; आकर्षक गणेशमूर्तींना भक्तांची पसंती
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार|गडचिरोली
चामोर्शी : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच चामोर्शी शहरात गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या दिवसरात्र लगबग सुरू असून, विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि मनमोहक रूपातील गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते रंगकाम, सजावट आणि मूर्तीला आकर्षक अंतिम रूप देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मूर्तिकार मेहनत घेत आहेत. गणरायाच्या मुकुटापासून ते वस्त्र, अलंकार आणि विविध रंगछटांपर्यंत बारकाईने काम केले जात असून, भक्तांचे लक्ष वेधून घेतील अशा सुंदर मूर्ती बाजारपेठेत दाखल होऊ लागल्या आहेत.
विशेष म्हणजे मूर्तिकारांच्या हातातील कलाकुसरीतून साकारलेल्या विविध रूपांतील गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांचीही उत्सुकता वाढली आहे. लहान घरगुती गणेशमूर्तींपासून ते मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या आकर्षक मूर्तींपर्यंत विविध प्रकार उपलब्ध होत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी शहरातील वातावरण भक्तिमय होऊ लागले असून, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषासाठी शहर सज्ज होत आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी मूर्तिकारांची सुरू असलेली ही अखेरची धावपळ भक्तांच्या उत्साहात आणखी भर घालत आहे.

