
उभ्या पिकांवर संकट; पाणी न मिळाल्यास पिके नष्ट होण्याची भीती
भेंडाळा| दि. १९ ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून नहराला पाणी येत नसल्याने रामाळा येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर संकट ओढवले आहे. पाण्याअभावी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जलसंपदा विभागाच्या भेंडाळा कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.
रामाळा येथील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर पोहोचले. यावेळी नहराला तातडीने पाणी सोडावे आणि शेतीसाठी नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शाखा अभियंता, भेंडाळा यांच्याकडे सादर केले.
नहराला वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके हातची जाण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नहराला पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना लचमा शिरगावार, अतुल भिरकुरवार, रवि पाल, अरुण देवतळे, नितेश मडावी यांच्यासह रामाळा येथील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे रामाळा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

