
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी | दि. १९ ऑगस्ट :
लॉयड मेटल मिशन फॉर ग्लोबल स्किल इंटरशिप, बोदली व पंचायत समिती चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. १९ ऑगस्ट रोजी चामोर्शी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

रोजगार मेळाव्यात लॉयड मेटल कंपनीच्या प्रतिनिधींनी उपस्थित युवकांना नोंदणी फॉर्म वितरित करून त्यांच्याकडून आवश्यक माहिती भरून घेतली.मेळाव्यात ११८ युवक व २१ युवतींची नोंदणी करण्यात आली.कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, कौशल्यविकास आणि निवड प्रक्रियेबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना उपलब्ध रोजगाराच्या संधींचा योग्य प्रकारे उपयोग करून कौशल्यविकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या रोजगार मेळाव्याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, लॉयडचे प्रोग्राम मॅनेजर दिनेश बोरसे, मोबिलायझेशन कोऑर्डिनेटर चंद्रशेखर पवार, मोनाली बोरकर, ज्ञानकी सोरेन, तुषार कर्णे, नितेश गट्टीवार, श्रावण वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, रोजगाराच्या आशेने मोठ्या संख्येने युवकांनी मेळाव्यात उपस्थित राहून नोंदणी फॉर्म भरले. युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

