kotgul Police

नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन; १९३० हेल्पलाइन क्रमांकाची दिली माहिती
कोरची : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोटगुल पोलीस स्टेशनच्या वतीने मोहल्ला समिती व शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीत कोटगुल पोलिसांकडून गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आली. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक नागेश टेकाम यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

या बैठकीत सायबर जनजागृती मोहिमेंतर्गत विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविषयी उपस्थित सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सायबर माध्यमातून होणारा पाठलाग, अश्लील मजकूर व छायाचित्रांचा प्रसार, इंटरनेटवरील मजकूर किंवा छायाचित्रांमध्ये संगणकाच्या माध्यमातून फेरफार करणे तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली.
नागरिकांनी आपले बँक खाते तपशील, एटीएम माहिती, ओटीपी तसेच वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले. तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून परिसरातील इतर नागरिकांमध्येही जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
कोणत्याही प्रकारची ऑनलाइन अथवा सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता तत्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीला कोटगुल पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला समिती व शांतता समितीचे एकूण १५ सदस्य उपस्थित होते. सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या आवाहनासह बैठकीची सांगता करण्यात आली.

