
महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा; संघटनात्मक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा

मुंबई | जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्रम्हणवाडे यांनी मुंबई येथील टिळक भवनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी ब्रम्हणवाडे यांनी डॉ. प्रसाद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याबाबत, आगामी राजकीय परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविणे आणि पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे याबाबतही यावेळी विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र प्रभारी म्हणून डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या नेतृत्वात काँग्रेसला राज्यात नवी ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात पक्ष संघटन अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमुळे गडचिरोली काँग्रेसच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

