
तालुकास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघाची दणदणीत बाजी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत डिस्नेलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूल, चामोर्शीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने आपल्या दमदार खेळाची छाप उमटवत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदावर नाव कोरले. संघाच्या या शानदार कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत प्रज्योत मेडी, कार्तिक मिस्त्री, दीक्षित पट्टेमवार, स्तवन भोयर आणि सोहम पोटवार या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या सांघिक खेळामुळे संघाने स्पर्धेत वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा बहुमान मिळविला.
या विजयासह डिस्नेलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावरही चामोर्शीचे नाव उज्ज्वल करण्याची संधी या खेळाडूंना मिळाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. श्रीधर रोक्कला, प्रशिक्षक श्री. प्रणय बरसागडे आणि तालुका क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक राकेश खेवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे प्राचार्य जे. विलास यांनी खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन दिले.
विजयी संघाचे अभिनंदन करताना शाळेच्या शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करून विजेतेपद मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या.
चामोर्शीच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय!
तालुक्यात विजयी झेप घेतलेल्या या ‘चॅम्पियन्स’कडून आता जिल्हास्तरावर मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे

