
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी रामगिरी बंगल्यावर भेटून दिल्या शुभेच्छा

नागपूर | जिल्हा|प्रतिनिधी गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कोहळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर सुधाकर कोहळे यांची भेट घेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती.
अखेर पक्षाने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भेटीदरम्यान डॉ. देवराव होळी आणि सुधाकर कोहळे यांच्यात आगामी निवडणुकीच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली. पदवीधर मतदारांशी प्रभावी संपर्क, संघटनात्मक बांधणी, पक्षाची भूमिका आणि निवडणुकीची तयारी यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर यावेळी विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.
नागपूर विभागातील पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची विकासाची भूमिका आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक नियोजन करण्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासोबत आमदार राजीव पोद्दार, नगरसेवक योगेश पाचोर आदी उपस्थित होते.
सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला आता चांगलीच रंगत येण्याची शक्यता असून, भाजपकडून निवडणूक प्रचाराची आणि मतदार संपर्क अभियानाची जोरदार तयारी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

