
घोडणकप्पी गावाला रस्ता मंजूर करा, जिवतीत 01 कोटी रुपयाच्या सामाजिक सभागृहाची घोषणा
जिवतीत आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात गजानन पाटील जुमनाके यांनी वाचला आदिवासीच्या समस्यांचा आमदारांपुढे पाढा
न्युज जागर :योगेश रामटेके 
जिवती :- तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, गावपाटील आणि समाजबांधवांच्या अथक सहकार्यातून जिवती तालुका मूळनिवासी एकता संघर्ष समितीच्या आयोजनात काल ता. 09 ऑगस्ट रोजी जागतिक मूळनिवासी दिन मोठ्या थाटात पार पडला.
या कार्यक्रमाला राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हीच परफेक्ट टायमिंग गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके यांनी हेरली आणि थेट त्यांनी आमदारांपुढेच आपल्या मनोगतात जिवतीच्या आदिवासी समाजाच्या समस्यांचा पाढाच वाचला आणि आमदारांही त्याला आपल्या भाषणातून प्रतिसाद दिला.
गो. ग. पा नेते गजानन पाटील जुमनाके यांनी आपल्या मनोगतात काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील मौजा घोडणकप्पी येथील एका आदिवासी महिलेचा रस्त्याअभावी प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा संदर्भ देत घोडणकप्पी या गावाला रस्ता मंजूर करण्याची मागणी केली, सोबतच जिवती तालुक्याच्या ठिकाणी 01 कोटी रुपयाचे सामाजिक सभागृह मंजूर करावं, गंगामाता देवस्थानाच्या धर्तीवर जंगीदेवी देवस्थानालाही “ब” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करुन देवस्थान परिसराच्या विकासासाठी पुनःच्छ 50 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करावा, गोंडीधर्म कोडचा विषय सभागृहात मांडावा अश्या विविध मागण्या त्यांनी मांडल्या. सोबतच या सर्व मागण्यांचे निवेदन त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे सुपूर्द केले.

या सोबतच पुढे ते समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले की, वीर बाबुराव शेडमाके, राजमाता राणी हिराई आत्राम, वीर बिरसा मुंडा, श्यामादादा कोलाम यांच्या सारख्या क्रांतिवीरांचा आणि समाजसुधारकांचा आदर्श समोर ठेवून समाजाने शिक्षण, संघटन, आणि विकासाचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून सशक्त, जागरूक आणि प्रगत समाज घडविण्याचा संकल्प केला.
पुढे आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणातून प्रथम जिवती येथे आदिवासी समाजासाठी 01 कोटी रुपयाचे सामाजिक सभागृह मंजूर करून देण्याची घोषणा केली सोबतच घोडणकप्पी गावाला रस्ता देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त करत आदिवासी समाजाच्या समस्यांचे निराकरण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले
या कार्यक्रमाला मंचावर कोदेपूर येथील बाजीराव पाटील वलका, डॉ. नागनाथ दुडुळे, माजी सभापती भीमराव मेश्राम, नगराध्यक्ष अनुसया राठोड, माजी नगराध्यक्ष पुष्पा नैताम, नगरसेविका सतलूबाई जुमनाके, नगरसेवक शामराव गेडाम, मारोती कुमरे, माजी सरपंच भोजू पा. आत्राम, झाडू कोडापे, हनुमंत कुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव जुमनाके, जिवती नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जमालुद्दीन शेख, जेष्ठ नेते भीमराव पाटील जुमनाके, सोनेराव पेंदोर, कोदेपूर आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव शेडमाके यांच्यासह जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच तथा गावापाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिवती तालुका मूळनिवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, कोषाध्यक्ष कंटू कोटनाके, केशवराव कुमरे, विजय पाटील जुमनाके, जंगू मेश्राम, गणपत वेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

