
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/मुंबई,दि.८ ऑगस्ट : आरमोरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था, विकासकामांमधील विलंब तसेच काही ठिकाणी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत आमदार रामदास मसराम यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी आ. मसराम यांनी आरमोरी मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली असून त्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने ती अल्पावधीतच खराब होत असून शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची बाबही त्यांनी मांडली.

यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित कामांची गुणवत्ता तपासून दोषी ठेकेदारांवर आवश्यक कारवाई करण्यात यावी, तसेच मतदारसंघातील अतिदुरवस्थेतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्पेशल रिपेअर फंड मधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ठोस मागणी आ. रामदास मसराम यांनी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. मसराम यांनी मांडलेल्या मागण्या व समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
आरमोरी मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी आपण सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आ. रामदास मसराम यांनी यावेळी सांगितले.

