
२९ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक संमेलन

गडचिरोली: येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे ‘जनता अवेक इंडिया’ राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महामानवांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेत समाजात चिकित्सक विचार, लोकशिक्षण, सामाजिक न्याय आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित संवादाची संस्कृती विकसित करणे, तसेच देशातील समकालीन प्रश्नांवर चर्चा व विचारमंथन घडवून आणणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
सदर संमेलन लोकसंघ – सोशल एज्युकेशन मूव्हमेंटच्या वतीने आयोजित करण्यात येणार असून, संमेलनाच्या पूर्वतयारी व नियोजनाच्या अनुषंगाने शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली येथील बळीराजा पॅलेस येथे नियोजन बैठक पार पडली.

या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशभरातील विविध क्षेत्रांतील विचारवंत, अभ्यासक, लेखक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशातील समकालीन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर नामवंत वक्त्यांच्या उपस्थितीत विविध वैचारिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषतः लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय, आदिवासी अधिकार, शिक्षण, युवकांचे प्रश्न, तसेच ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके-विमुक्त आणि इतर वंचित समाजघटकांच्या प्रश्नांवर मुक्त संवाद घडवून आणण्यात येणार आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी ‘आम्ही भारताचे लोक’ ही संवैधानिक भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या संमेलनातून करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या निमित्ताने समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांवर आधारित विशेष सांस्कृतिक जलशाचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील कलावंत सहभागी होणार असून, परिवर्तनवादी गीते, लोककला, रॅप आणि विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यात येणार आहे. वैचारिक मंथनासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा संगम या संमेलनातून अनुभवता येणार आहे.
तसेच संमेलनस्थळी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पुस्तक प्रदर्शन व विक्री, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सहाय्य, उच्च शिक्षण व करिअर मार्गदर्शन, पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच इतर विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे, परिवर्तनवादी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्था व नागरिकांमध्ये संवाद व सहकार्याच्या संधी निर्माण करणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
या नियोजन बैठकीला ॲड.बोधी रामटेके, देवेंद्र सोनपिपरे, अन्नपूर्णा सिडाम, विनोद मडावी, धर्मानंद मेश्राम, शाम रामटेके, संतोषी सूत्रपवार, तनुज पेंदोर, ॲड. नभा शेंडे, संचाली गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. बैठकीत संमेलनाचे स्वरूप, वैचारिक सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, निमंत्रित वक्ते, नोंदणी व्यवस्था, प्रचार-प्रसार आणि आयोजनाच्या विविध जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील विविध भागांतील विचारवंत, लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी यमुना लॉन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकसंघ – सोशल एज्युकेशन मूव्हमेंटच्या वतीने करण्यात आले आहे.

