
अमित कत्तीवार |विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली (गडचिरोली) : कांदोळी ते ताडगाव मार्गादरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या जोडरस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याच्या भरावासाठी आवश्यक असलेल्या मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पावसामुळे ही माती चिखलात रूपांतरित झाल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जोडरस्ता मजबूत व वाहतुकीस योग्य करण्यासाठी योग्य दर्जाचा भराव टाकणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष कामात मातीचा वापर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाच्या सरी कोसळताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून दुचाकींसह चारचाकी व इतर वाहने चिखलात फसून राहण्याच्या घटना घडत आहेत. या मार्गावरून गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची नियमित ये-जा असते. मात्र, रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहन चिखलात फसल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. निकृष्ट कामामुळे भविष्यातही अडचणींची शक्यता जोडरस्त्याच्या कामात योग्य साहित्याचा वापर न झाल्यास पावसाळ्यात रस्ता पुन्हा वाहून जाण्याची किंवा खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होऊनही नागरिकांना कायमस्वरूपी चांगला रस्ता मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित बांधकाम विभागाने तातडीने या कामाची पाहणी करून वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी केली आहे.

तसेच कामाच्या अंदाजपत्रकानुसार आणि तांत्रिक निकषांनुसार काम झाले आहे की नाही, याची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. अधिकाऱ्यांच्या पाहणीची मागणी कांदोळी–ताडगाव पुलाच्या जोडरस्त्याच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या मुरुम व इतर साहित्याची गुणवत्ता, कामाची जाडी, दबाई तसेच तांत्रिक निकषांची पूर्तता झाली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, मुरुमाऐवजी मातीचा वापर केल्याचा आरोप खरा असल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून निकृष्ट काम दुरुस्त करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जोडरस्ता तातडीने वाहतुकीस योग्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

