
जिल्हा प्रतिनिधी | नितेश गट्टीवार
गडचिरोली/अहेरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, शुक्रवारी अहेरी येथील राजवाड्यात पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महिला व युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. 
पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई आत्राम यांनी केले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी तनुश्रीताई आत्राम होत्या. यावेळी मंचावर किष्किंद्रराव बाबा आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य रामेश्वरराव बाबा आत्राम, नारायणराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई अलोणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षा सारिका ताई गडपल्लीवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘एकजुटीने काम करा, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा!’
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना तनुश्रीताई आत्राम यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याचे आवाहन केले. पक्षाचे संघटन बूथपातळीपर्यंत मजबूत करून कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) एकहाती सत्ता प्रस्थापित करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेल्या विधायक विकासकामांवर प्रकाश टाकत, पक्षाच्या विचारधारेचा आणि विकासकामांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. महिला व युवतींचा पक्षसंघटन विस्तारात मोठा सहभाग असावा, असेही त्यांनी सांगितले.
महिला-युवतींच्या खांद्यावर संघटनेची नवी जबाबदारी
आढावा बैठकीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षपदी प्रणाली दुर्गे यांची निवड करण्यात आली. तसेच नागेपल्ली शहराध्यक्षपदी अश्विनी शेडके आणि आलापल्ली शहराध्यक्षपदी वैष्णवी येरबतनवार यांची नियुक्ती करण्यात आली. तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अहेरी तालुकाध्यक्षपदी भाग्यश्री बेझलवार, तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी शहराध्यक्षपदी श्रीशा कुडकावार आणि आलापल्ली शहराध्यक्षपदी सोनाली पांढरे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
महिला व युवतींच्या उपस्थितीने बैठकीला उत्साह
बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार यांनी केले, तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अहेरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन आणखी बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

