
नितेश गट्टीवार|गडचिरोली
गडचिरोली दि. ६ ऑगस्ट : स्वातंत्र्यानंतर तब्बल अनेक दशकांपासून अंधारात जीवन जगणाऱ्या कोरची तालुक्यातील ग्रामपंचायत आर्मुरकसा अंतर्गत देहानटोला या दुर्गम गावात अखेर विद्युत प्रकाश पोहोचला आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा बहुप्रतीक्षित प्रश्न मार्गी लागला असून, गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) त्यांच्या हस्ते वीजपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले.
वीजेसारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या देहानटोला येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे अंधारातच जीवन व्यतीत करावे लागत होते. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार रामदासजी मसराम यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता संपूर्ण गाव विद्युत प्रकाशाने उजळून निघाले असून ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

गावात वीज पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण होणार आहे. तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांनी जल्लोषात आमदार रामदासजी मसराम यांचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी माजी सभापती परसराम टिकले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (कुरखेडा) जीवन पाटील नाट, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (कोरची) मनोज अग्रवाल, धनपाल मिसार, उपविभागीय अभियंता जांभूळकर, माजी सभापती श्रावण मातलाम, उपसरपंच परमेश लोंहबरे यांच्यासह राजेश नैताम, दानशूर हलामी, आत्माराम ब्राह्मणकर, असरसिंग नरुटी, रविंद्र उईके, दिनेश जाळे, सुनील तुलावी, महादेव जाळे, अर्जुन मुलेटी, तलवार हिडामी, दशरथ हिडामी, राजेश मुलेटी, मनोज उईके, सूरज हिडामी, प्रकाश भारद्वाज, सुलोचना जाळे, राधा कोडाप, रिना जाळे, प्रभाबाई हिडामी, देवंतीन टेंभुर्णे, कमलाबाई जाळे, सामबाई पुटो, अहिल्या पुटो, रविंद्र जाळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

