
माजी आ.डाॅ.देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती, नागरिकांना मसाला भाताचे वाटप
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी,दि.१ ॳॉगस्ट :

चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रमुख उपस्थिती लावत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डॉ. देवराव होळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना वाचा फोडत सामाजिक न्यायाचा लढा उभारणारे अण्णाभाऊ साठे हे समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रत्येकाने अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते नागरिकांना मसाला भाताचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास किशोरजी दोषी, राकेश पेशट्टीवर, लक्ष्मण रामटेके, विनोद पेशट्टीवर, साईनाथ बुरांडे, तुषार बनपूरकर, आबाजी दासरवार, विकास मोहुर्ले, सचिन गोरडवार, शुभम पौरकर, नितेश कोहळे, आनंद येमूलवार, अजय मोहुर्ले, विलास कोहळे यांच्यासह चामोर्शीतील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सामाजिक एकता, समता आणि बंधुभावाचा संदेश देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालत समाजपरिवर्तनासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

