
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.१ ॳॉगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत “चरखे के पास चर्चा” या लोकसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधावा, असे आवाहन काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही विमानतळ, एमआयडीसी आणि इतर विकास प्रकल्पांसाठी सुपीक शेती संपादित केली जात असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विविध शासकीय विभागांतील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे रखडली असून बेरोजगारीमुळे युवकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. एसटी महामंडळाची अपुरी बससेवा, रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे पीक व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक दुर्गम भागांमध्ये आजही रुग्णांना खाटेवरून किंवा पायी रुग्णालयात नेण्याची वेळ येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या गंभीर प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
“चरखे के पास चर्चा” या लोकसंवाद मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेऊन ते शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही गेल्या सात ते आठ महिन्यांत त्यांनी जिल्ह्याला भेट दिलेली नाही. त्यामुळे या लोकसंवाद मोहिमेत सहभागी होऊन शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, अनिल कोठारे, प्रभाकर वासेकर, दिवाकर निसार, गजानन नैताम, विजय लाड, श्रीनिवास ताटपल्लीवार, मोरेश्वर हजारे, हरबाजी मोरे, योगेंद्र झंजाळ, जितेंद्र मुनघाटे, अब्दुल पंजवानी, प्रतीक बारसिंग, निखिल खोब्रागडे, नितीन राऊत, शितल ठवरे, मीनल चिमुरकर, विमल भोयर, स्वप्निल बेहेरे, साहिल वडेट्टीवार, रामचंद्र भांडेकर, विनोद भांडेकर, निकेश तुंकलवार, अरविंद मादेशवार, विजय राऊत, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, मारुती कांबळे, लीलाधर गुरनुले, स्वप्निल टिकले, विकास गेडाम, मनोहर गेडाम, अमित गावतुरे, निकेश कामीडवार, विपुल एलटीवार, गौरव एनप्रेड्डीवार, संदीप चापले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

