
अमित कत्तीवार |विशेष जिल्हा प्रतिनिधी
आलापल्ली (गडचिरोली): आलापल्ली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सलीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत पक्षात अधिकृत प्रवेश केला. अहेरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींमध्ये या पक्षप्रवेशाची विशेष चर्चा होत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सलीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे आलापल्ली परिसरातील पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस चालना मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

हा पक्षप्रवेश माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सलीम शेख यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी विश्वासाने सोपविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
पक्षप्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येररावार, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते इरफान पठाण, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, मख्नुर भाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आगामी काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सलीम शेख यांच्या पक्षप्रवेशामुळे आलापल्ली परिसरातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात आणखी काही कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

