
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
नवी दिल्ली, दि. २० जूलै : देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) प्रवेश प्रक्रियेत DNT/NT/SNT प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेले ५ टक्के आरक्षण तात्काळ रद्द करून सर्वच्या सर्व (१००%) जागा अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवाव्यात, अशी ठाम मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
डॉ. होळी यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण मिळावे, त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावून स्पर्धात्मक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे, या उद्देशाने भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयामार्फत एकलव्य मॉडेल निवासी शाळांची स्थापना करण्यात आली आहे. या शाळांचा मूळ हेतू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा असून, त्यामध्ये इतर प्रवर्गांसाठी आरक्षण ठेवणे हा मूळ उद्देशालाच छेद देणारा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था (NESTS) व आदिवासी कार्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रवेश मार्गदर्शक सूचनांनुसार EMRS मध्ये DNT/NT/SNT प्रवर्गासाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संधी कमी होत असून त्यांच्या शैक्षणिक हक्कांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा डॉ. होळी यांनी निवेदनातून मांडला.
त्यामुळे EMRS मधील DNT/NT/SNT प्रवर्गासाठी असलेले ५ टक्के आरक्षण तातडीने रद्द करून सर्व जागा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
यावेळी अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. नरेंद्र उंदीरवाडे तसेच जिल्हा महासचिव अमोल कुळमेथे उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्युएल ओराव यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. देवराव होळी यांनी दिली.

