
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
तालुक्यातील बोटेकसा परिसरात सुरू असलेल्या विद्युत तार चोरीच्या प्रकाराला अखेर पोलिसांनी आळा घालत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोटेकसा येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास होत होता. यामागे विद्युत तार चोरीचा प्रकार असल्याचे उघड झाले. महावितरण (MSEDCL) विभागाकडून सुरू असलेल्या कामादरम्यान खांबांवरील अॅल्युमिनियम विद्युत तारा मागील ४ ते ५ दिवसांपासून चोरीस जात असल्याचे निदर्शनास आले. #newsjagar

याबाबत असिस्टंट अभियंता वीज वितरण कंपनी यांनी कोरची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून सापळा रचला. तपासादरम्यान बोटेकसा–बीहटेटोला मार्गावर संशयितांची हालचाल आढळून आली.
पोलीस पथकाने कारवाई करत रोहित बाबुराव मडावी (वय २२, रा. गुंटेकसा, ता. कोरची)धनुराम लखन पोटावी (वय २४, रा. नांदळी), संदीप राघोजी मडावी (वय ३२, रा. नांदळी)या तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली विद्युत तारे तसेच गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. #news jagar
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.

