
-तिसऱ्या पिढीचा सवाल “आम्हाला प्रकाश कधी मिळणार ?”
अमरावती – आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागात प्रत्येक घरात वीज पोहोचली, असा दावा सरकार आणि वीज कंपन्या करत असताना, प्रत्यक्षात अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कुलांगणा (खुर्द) गावातील एका वस्तीत आजही तिसरी पिढी अंधारातच जगत आहे.
या वस्तीत किमान 40 घरं असून गेल्या 50 वर्षांपासून वीजपुरवठा न झाल्यामुळे ग्रामस्थांचे आयुष्य अक्षरशः काळोखात गेले आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, आजवरच्या सर्व लोकप्रतिनिधींनी “लवकरच वीज मिळेल” अशी केवळ आश्वासनांची पखरण केली. मात्र वास्तवात एकही काम झाले नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी सरळ सवाल केला आहे – “आम्हाला अंधारात कुणी ठेवले ? आणि अजून किती काळ ठेवणार ?”या गंभीर प्रश्नाचे उत्तर आणि तातडीने वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी घेऊन ग्रामस्थ महिला-पुरुष मिळून येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी परतवाडा येथील महावितरण (MSEDCL) कार्यकारी अभियंता कार्यालयात धडक देणार असून, अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.वीज नसल्याने शेतमाल प्रक्रिया, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. या वस्तीतल्या मुलांना दिव्याऐवजी अजूनही कंदील, चुलीच्या उजेडात अभ्यास करावा लागतो. तर महिलांना घरकाम करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.
गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, यावेळी फक्त निवेदन देऊन थांबणार नाही तर ठोस निर्णय व ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


