
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार गडचिरोली
भेंडाळा, दि.३ जूलै : राज्यभर शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचा उत्साह असताना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या सुपीक शेतजमीन अधिग्रहणाच्या विरोधात १४ गावांतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत प्रतीकात्मक शाळाबंद आंदोलन केले. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक उपस्थित असतानाही वर्गखोल्या विद्यार्थ्यांविना ओस पडल्या.
भेंडाळा, घारगाव, दोटकुली, खंडाळा, रामाळा, मोहुर्ली, फराडा, फोकुर्डी, वाघोली, वेलतूर रिठ, सगणापूर, कान्होली, नवेगाव माल आणि चाकलपेठ या १४ गावांतील शेतकरी प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या शेतजमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध करत आहेत. “कोणत्याही परिस्थितीत एक इंचही शेती देणार नाही,” असा एकमुखी ठराव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शासन आणि प्रशासनाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात तीन दिवस ठिय्या आंदोलन, मुंडन आंदोलन तसेच विविध लोकशाही मार्गाने आंदोलने केली. मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनीही शाळाबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे परिसरातील अनेक शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक नियोजित वेळेत उपस्थित असूनही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जाणवली.
भेंडाळा परिसरातील शेतजमिनी ओलिताखालील, बहुपीक व बारमाही उत्पादन देणाऱ्या आहेत. येथे धान, भाजीपाला, मका, मिरची, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या सुपीक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास हजारो शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
“शेतजमीन अधिग्रहणाचा शासन निर्णय रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. हा लढा शिक्षणाच्या विरोधात नसून शेती, उपजीविका आणि भावी पिढीच्या भवितव्यासाठी आहे,” अशी भूमिका भेंडाळा परिसर शेतकरी बचाव आंदोलन समितीचे अध्यक्ष मनोज पोरटे, गाव समितीचे पदाधिकारी व समस्त शेतकरी बांधवांनी मांडली.

