
न्यूज जागर|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आष्टी, दि.३ जूलै: ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देतानाच स्वच्छतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आष्टी येथे पार पडला. स्पंदन फाउंडेशन, गडचिरोली, विंग्स ऑफ होप फाउंडेशन, चंद्रपूर आणि श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्था, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कोहळे पेट्रोल पंप सभागृहात ८० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आष्टी, इल्लूर, ठाकरी, कुणघाडा, चपराळा, मार्खंडा कंसोबा, अनखोडा, उमरी आणि चंदणखेडी येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, कंपास बॉक्स, पाण्याची बाटली आदी आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन नेल कटर, नॅपकिन आदी वस्तूंचा समावेश असलेले स्वच्छता किटही वितरित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित शाळेत उपस्थित राहण्याची गरज, स्वच्छतेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत आवश्यक शैक्षणिक साहित्य पोहोचावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमास आष्टीच्या सरपंच सौ. बेबीताई बुरांडे, अध्यक्षा सौ. जानवी विशालजी काळे, स्पंदन फाउंडेशनचे डॉ. धम्मदीप बोदेले, सौ. पूजा बोदेले, डॉ. सौरभ नागुलवार, डॉ. यज्ञश्री नागुलवार, सौ. जानवी लोहंबरे, विंग्स ऑफ होप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. माधुरी इंगळे, उपाध्यक्षा डॉ. सुषमा लिडर, सचिव तथा श्री छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष पवन रामगिरकार, कोषाध्यक्ष कपिल मसराम, सहसचिव डॉ. नेहा सोनारकर, सदस्य निनाद अवदूत तसेच देवा बोरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि स्वच्छतेचा संदेश देणारा ठरला.

