
मूल | प्रतिनिधी – चेतन कामडे न्यूज जागर..
नगर परिषद, मूल यांनी संबंधित कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश देऊनही अद्याप काम सुरू झाले नसल्याने संबंधित प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी आता नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.
नगर परिषद, मूलचे मुख्याधिकारी यांनी 1 जून 2026 रोजी संबंधित कंत्राटदारास पत्र देऊन सुनील गोगीरवार यांच्या घरापासून स्व. नगरसेवक विनोद कामडे यांच्या घरापर्यंत तसेच तेथून नथूजी कावळे यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे जाणे, खडी उखडणे आणि रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या संदर्भात इंटक जिल्हा उपाध्यक्ष यांनी सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र, मुख्याधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित कंत्राटदाराने अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही व बिल पास झाल्यामुळे कंत्राटदार निश्चिन्त असेल असं आरोप आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत नगरसेवक श्री तुकाराम गुरनुले यांनी सांगितले की, “नागरिकांना चांगल्या दर्जाचा रस्ता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने आदेश दिल्यानंतरही काम होत नसेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी.”
दरम्यान, लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास नागरिकांच्या वतीने नगर परिषद, मूल येथे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक श्री तुकाराम गुरुनुले तसेच स्थानिक नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

