
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
तालुक्यातील कैमूल गावाजवळ पुलावरून ट्रॅक्टर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतकाचे नाव राकेश इंद्रपाल वालदे (वय ३०, रा. कडीकसा, ता. देवरी, जि. गोंदिया) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर पुलाला धडक देऊन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील व ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावून गेले, मात्र तोपर्यंत चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.

यानंतर पोलीस पाटील यांनी तातडीने पोलीस स्टेशनला माहिती देत तक्रार दाखल केली तसेच मृतकाच्या वडिलांनाही घटनेची माहिती दिली. अपघातग्रस्त ट्रॅक्टरखाली अडकलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलावण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सायंकाळी उशिरा सुमारे सात वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयात पोहोचवण्यात आला असून शवविच्छेदन (PM) करण्यात येणार आहे.
मृतकाच्या वडिलांना दोन मुले असून, शेतीच्या कामासाठी त्यांनी संबंधित ट्रॅक्टर घेतला होता. मात्र, राकेश वालदे यांनी वडिलांना न सांगता कोरची तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत कैमूल परिसरात नांगरणीच्या कामासाठी ट्रॅक्टर नेल्याची माहिती समोर आली आहे. काम आटोपून गावाकडे परत येत असताना पुलाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट पुलाखाली कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ही घटना समजताच परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

