
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
चामोर्शी, दि. १५ जुलै :
चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे १४ जुलै २०२६ पासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत असून, नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी केले आहे. या संदर्भात उपविभागीय अभियंता यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून नागरिकांना तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजमध्ये तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणीसाठा करण्यात येणार आहे. सध्या बॅरेजमधील पाण्याची पातळी सुमारे १७५.४०० मीटर असून ती १७८.५०० मीटरपर्यंत राखण्यासाठी बॅरेजचे दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असून नदीकाठच्या परिसरात विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन किंवा सरळ खरेदी करण्यात आली आहे अथवा प्रक्रिया सुरू आहे, त्यांनी संबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारची शेतीची कामे करू नयेत. तसेच प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
याशिवाय मच्छीमार, पशुपालक, शेतकरी आणि नदीपात्रात वावर करणाऱ्या नागरिकांनी नदी ओलांडणे टाळावे, गुरेढोरे नदीकाठावर नेऊ नयेत तसेच नदीलगतच्या शेतांमध्ये काम करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा नुकसान झाल्यास त्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार, पोलिस प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच संबंधित विभागांना गावागावात दवंडी व जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून अनावश्यकपणे नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नदीपात्रात जाणे व नदी ओलांडणे टाळावे.
गुरेढोरे व जनावरे नदीकाठावर नेऊ नयेत.
नदीलगतच्या शेतांमध्ये काम करताना विशेष खबरदारी घ्यावी.
बुडीत क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे काम करू नये.
प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
प्रशासनाच्या या सूचनांमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होणार असून, नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

