
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली ,१४ जुलै :
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी समाजसेवेचा संदेश देणाऱ्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वाढदिवसानिमित्त लोकसभा क्षेत्रातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयासह विविध तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे, खाऊ वाटप आणि भोजनदान करण्यात आले. या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.
गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा (रामनगर), नगरपरिषद शाळा (रामपुरी), सावित्रीबाई फुले शाळा (गोकुळनगर) तसेच भगवंतराव प्राथमिक व कनिष्ठ विद्यालय (गोकुळनगर) येथील विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. याशिवाय संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णसेवा, शैक्षणिक साहित्य वितरण, भोजनदान आदी सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, नगरसेवक तथा शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष माधव गावड, सहकार सेल जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे पदाधिकारी, विविध सेलचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव केला. शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, शेतकरी कल्याण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याचे कौतुक करत, वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याची परंपरा भविष्यातही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
समाजसेवेचा संदेश देणारे हे उपक्रम नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले असून, खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात उत्साहाचे आणि सेवाभावाचे वातावरण निर्माण झाले.

