
स्वयं पिल्लीवार व पंकज पेशटीवार यांची महावितरणकडे ठाम मागणी; तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्याचे आवाहन

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत चामोर्शी शहरातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, तसेच भाविकांच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वयं पिल्लीवार व पंकज पेशट्टीवार यांनी महावितरण प्रशासनाकडे अखंडित वीजपुरवठ्याची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या चामोर्शी उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले.

नवरात्रोत्सवात वीज खंडित झाल्यास उत्सवाच्या आनंदावर विरजण!
चामोर्शी शहरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध दुर्गा मंडळांकडून देवीची आरती, पूजा, गरबा, दांडिया तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी देवीच्या दर्शनासाठी आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांची गैरसोय होण्याबरोबरच कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दिवसा आणि रात्री अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तांत्रिक बिघाडासाठी विशेष पथक सज्ज ठेवा!
उत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणने आवश्यक ती पूर्वतयारी करावी. शहरातील वीजवाहिन्या, विद्युत खांब आणि दुर्गा मंडळांच्या परिसरातील वीजवाहक तारांची तपासणी करून संभाव्य तांत्रिक अडचणी वेळीच दूर कराव्यात. तसेच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक सज्ज ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली.
भाविकांची गैरसोय टाळण्याची जबाबदारी महावितरणची!
नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये आणि सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, यासाठी महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. केवळ वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी आधीच खबरदारी घेऊन संभाव्य अडचणी टाळाव्यात, असे आवाहन स्वयं पिल्लीवार व पंकज पेशटीवार यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रतन मल्लिक यांच्यासह इतर नागरिक व तरुण उपस्थित होते. आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

