
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १४ जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गडचिरोली आगार व विभागीय कार्यालयात कामगारांच्या प्रलंबित समस्या, प्रवासी सुविधांचा विस्तार आणि बससेवा अधिक सुरक्षित व सक्षम करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भूषविले.

बैठकीस विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश गेडाम, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, विभागीय नियंत्रक वडस्कर, आगार व्यवस्थापक सचिन नेवारे, सुरक्षा अधिकारी लोखंडे, विभागीय सचिव नवनाथ घायाळ, उपाध्यक्ष बंडुजी पत्तीवार तसेच एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चालक-वाहकांच्या रजा कोट्यात झालेली कपात पूर्ववत करणे, जून महिन्यातील वैद्यकीय रजा तातडीने मंजूर करणे, ई-तिकीट (ETIM) मशीनमधील तांत्रिक बिघाड दूर करणे, दोषपूर्ण बॅटऱ्या बदलणे, झिजलेल्या टायरांमुळे चालकांवर लादण्यात येणारी दंडात्मक कारवाई थांबविणे, गडचिरोली व अहेरी आगारात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नक्षलपीडित कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे तसेच आलापल्ली बसस्थानक परिसरातील अवैध पार्किंग हटविण्याची मागणी करण्यात आली.
डॉ. अशोक नेते यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ठामपणे मांडत प्रत्येक बसची नियमित फिटनेस तपासणी, ब्रेक, टायर, स्टेअरिंग व इंजिनची काटेकोर तपासणी करण्याची मागणी केली. अतिजुन्या बसेस बदलून नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातील बंद बसफेऱ्या तातडीने सुरू करण्यावर त्यांनी भर दिला.
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना वेळेवर आणि सुरक्षित बससेवा मिळावी, शाळेच्या वेळेनुसार बसफेऱ्यांचे नियोजन करावे, बसस्थानकांवर स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी व प्रवासी निवारा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय मार्कंडा देव, मुतनूर यांसारख्या धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नियमित बससेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
बैठकीत विभागीय नियंत्रक वडस्कर आणि आगार व्यवस्थापक सचिन नेवारे यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत नियमानुसार आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या सर्व प्रश्नांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नेते म्हणाले, “एसटी महामंडळाचा खरा आधार म्हणजे कामगार आणि सामान्य प्रवासी. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने सर्व रास्त मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन एसटी सेवा अधिक सुरक्षित, सक्षम आणि जनाभिमुख करावी.”
कामगारांचे प्रश्न सोडविणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि दुर्गम भागातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

