
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १४ जुलै : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके व अन्य आवश्यक कृषी साहित्याचा अखंड आणि वेळेवर पुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरवळकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध कृषी समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर खते, बियाणे, कीटकनाशके व इतर कृषी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

कोवासे यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतकरी यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाणे मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला कृषी साहित्याच्या टंचाईमुळे पेरणी किंवा शेतीची कामे खोळंबू नयेत, यासाठी कृषी विभागाने प्रभावी नियोजन करून वेळेत साहित्य उपलब्ध करून द्यावे.
यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून कृषी साहित्याच्या पुरवठ्यात कोणताही हलगर्जीपणा किंवा विलंब सहन केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे, हेमंत मोहितकर आणि विलास ठाकरे उपस्थित होते.

