
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) हा सर्वसामान्य, शेतकरी, आदिवासी आणि वंचित घटकांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारा पक्ष असून, पक्षाची जनहितवादी विचारधारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
गडचिरोली शहरातील अभिनव लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. मेळाव्याला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पक्षसंघटनेचे शक्तिप्रदर्शन घडवून आणले.

यावेळी आमदार आत्राम म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात विकासाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविली जात असून, ही कामे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. संघटन मजबूत करण्यासाठी गावोगावी जनसंपर्क अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सरचिटणीस लिलाधर भरडकर, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम,जेसा मोटवानी, युवक जिल्हाध्यक्ष तथा न.प.सभापती लिलाधर भरडकर , नंदू नरोटे, रिंकु पापडकर, लौकिक भिवापुरे,अमोल कुलमेथे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी जिल्हाध्यक्षपदाची सलग दहा वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उत्साह, जल्लोष आणि घोषणाबाजीने दुमदुमलेल्या वातावरणात हा मेळावा पार पडला.

