
जिल्हा प्रतिनिधी : नितेश गट्टीवार
चामोर्शी, दि. १४ जुलै :चामोर्शी शहरातील नव्याने उभारण्यात आलेले अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले असून, दुसरीकडे हजारो प्रवाशांना जुन्या बसथांब्यावर अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली भव्य इमारत सर्व सुविधा असूनही अद्याप जनतेसाठी खुली करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत जुन्या बसथांब्यावर चिखल, साचलेले पाणी, अपुरी आसनव्यवस्था आणि गर्दी यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बसची प्रतीक्षा करताना पावसापासून संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची अक्षरशः फरफट होत आहे. अनेकांना चिखलातून वाट काढत बसमध्ये चढावे लागत असून, रोजचा प्रवास हा त्रासदायक ठरत आहे.

विशेष म्हणजे, सर्व आधुनिक सुविधा असलेले नवीन बसस्थानक पूर्णपणे तयार असूनही ते केवळ उद्घाटनाअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “आमदार साहेब, उद्घाटन नेमके केव्हा होणार?”, “जनतेच्या सेवेसाठी उभारलेली इमारत जनतेपासून दूर का ठेवली जात आहे?” असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या बसस्थानकाचा लाभ तातडीने सर्वसामान्यांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेमुळे नागरिकांना जुन्याच बसथांब्यावर गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात या समस्या अधिक गंभीर बनल्या असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन बसस्थानक जनतेसाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
चामोर्शीसारख्या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी आधुनिक बसस्थानक तयार असूनही त्याचा वापर होत नसल्याने विकासकामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जनतेच्या पैशातून उभारलेली सुविधा केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत बंद राहणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आता चामोर्शीकरांची एकच अपेक्षा आहे—उद्घाटनाच्या तारखांची चर्चा नको, तर नवीन बसस्थानक तातडीने जनतेच्या सेवेत सुरू व्हावे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनभावनेचा किती लवकर आदर करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

