
मूल | न्यूज जागर प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात शासनाच्या ५० किलो वजन मर्यादेच्या नियमाला केराची टोपली दाखवत हमाल आणि माथाडी कामगारांकडून आजही ६० ते ८० किलो, तर काही ठिकाणी त्याहून अधिक वजनाची पोती उचलून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)ने केला आहे. या प्रकारामुळे हजारो कष्टकरी कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा संताप इंटकने व्यक्त केला आहे.
यासंदर्भात इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी श्री.दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले. शासनाने ५० किलोपेक्षा अधिक वजनाची पोती वाहून नेण्यास स्पष्ट मनाई केली असतानाही कृषी उत्पन्न बाजार समित्या, शासकीय व खासगी गोदामे, व्यापारी प्रतिष्ठाने आणि राईस मिल्समध्ये सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

“नफ्यासाठी कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,”असा घणाघाती आरोप करत इंटकने म्हटले आहे की, रोजंदारीवर पोट भरणाऱ्या हमालांना जादा वजनाची पोती उचलण्यास भाग पाडले जात आहे. परिणामी अनेक कामगार पाठीचे विकार, मणक्याच्या गंभीर समस्या, सांधेदुखी, हृदयविकार आणि कायमस्वरूपी अपंगत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मात्र संबंधित व्यापारी आणि आस्थापनांवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंटकने ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर तात्काळ बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई, तसेच शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येणारा शेतमालही ५० किलोच्या प्रमाणित पोत्यांमध्येच स्वीकारणे बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.
“३० दिवसांत कारवाई करा, अन्यथा जिल्ह्याचे चाक थांबवू,” असा थेट इशारा देत इंटकने सांगितले की, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हमाल कामगारांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन आणि कामबंद आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शासनाचा ५० किलोचा नियम प्रत्यक्षात कधी लागू होणार आणि कामगारांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

