
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यात दिव्यांग बांधवांना मिळणारी पेन्शन योजना महिनोनमहिने थांबलेली असून शासनाच्या ढिसाळ धोरणांमुळे व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दिव्यांग नागरिक अक्षरशः उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. योजनांचा केवळ कागदी गाजावाजा करून प्रत्यक्षात अंमलबजावणीत गंभीर हलगर्जीपणा होत असल्याची तीव्र टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
मूकबधिर तसेच इतर दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे आर्थिक सहाय्य वेळेवर न मिळाल्यामुळे औषधोपचार, अन्न व दैनंदिन गरजांसाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील परिस्थिती अधिकच बिकट असून शासनाने या सर्वात दुर्बल घटकाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या गंभीर प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) एटापल्ली तालुका कमिटीने तहसीलदारांना धडक निवेदन देत शासन व प्रशासनाला जाब विचारला आहे. पेन्शन वितरणातील अनियमिततेमागील कारणांचा तात्काळ शोध घेऊन योजनेतील सर्व अडचणी दूर कराव्यात व दिव्यांगांना नियमित व वेळेवर पेन्शन मिळेल यासाठी ठोस यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचा इशारा:
“शासन दिव्यांगांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. हक्काची पेन्शन देण्यात शासन अपयशी ठरत असेल तर हे थेट जनविरोधी धोरण आहे. तातडीने पेन्शन नियमित न केल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशारा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.
या निवेदनावेळी कॉ. सुरज जककुलवार जि.सदस्य ,कॉ.जूबेदा शेख, कॉ.गीता दासरवार व इतर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ताजुद्दीन शेख, हेमंत आत्राम, गौरव दासरवार, अर्जुन मटामी यांसह अनेक दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. अनेक नागरिक या मुद्याला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते.

