
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
बोटेकसा येथील रेशन दुकानातील गैरकारभारामुळे संतप्त झालेल्या संपूर्ण गावकऱ्यांनी थेट तहसीलदार कार्यालय गाठत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गावकऱ्यांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रेशन दुकानदाराकडून नागरिकांना नियमित धान्य मिळत नाही, वितरणात अनियमितता असून ऑनलाईन दाखवून प्रत्यक्षात धान्य न देण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी एकत्र येत प्रशासनाला धडक दिली. “अशा गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

