
अमित कत्तीवार | विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली
गडचिरोली : रेगडी-घोट मार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येविरोधात रेगडी येथे आज भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करून वाहतुकीस सुरक्षित बनविण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
रेगडी-घोट हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग असून, या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच रुग्णवाहिका आणि शासकीय वाहने प्रवास करतात. मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविणे अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून, अनेक किरकोळ अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची वास्तविक स्थिती लक्षात येत नसल्यामुळे दुर्घटनांची शक्यता अधिक वाढली आहे.

आंदोलनात शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा सचिव प्रशांत शाहा तसेच विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष अशोक पोरेडीवार यांनीही सहभाग घेत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. विविध सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश शाहा म्हणाले, “रेगडी-घोट मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. जनतेच्या जीवाशी खेळणारे हे दुर्लक्ष त्वरित थांबवावे. जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
आंदोलनादरम्यान संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा भविष्यात आणखी मोठे लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

