
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
धनंजय स्मृती विद्यालय, बेतकाठी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावलेले श्री. रमेश विनायक गहाणे आणि श्री. त्रिंबक श्रीराम पुस्तोडे यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ व सत्कार सोहळा दि. १० जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात दोन्ही शिक्षकांचे मोलाचे योगदान राहिले असून, त्यांच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय स्मृती विद्यालय अंगाराचे माजी प्राचार्य मा. श्री. उत्तमजी पारधी सर होते. विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था अंगाराचे सचिव मा. ॲड. घनश्यामजी कापगते सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम विद्यालय, कोरचीचे प्राचार्य श्री. नंदू गोबाडे सर, प्राचार्य श्री. अनिल संग्रामे सर, प्राचार्य श्री. गोपालदास लांजेवार सर तसेच माजी प्राचार्य श्री. सुकलाल रामटेके सर व श्री. पांडुरंग नागपुरे सर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या चारही विद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माँ सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्राचार्य श्री. गोपालदास लांजेवार सर यांनी प्रास्ताविकातून दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा आढावा घेतला. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. गहाणे व श्री. पुस्तोडे यांनी विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण, संस्कार आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.
उत्तर देताना दोन्ही शिक्षक भावूक झाले होते. त्यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत विद्यालयाशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. तसेच संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन दोन्ही सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. होमराज बिसेन सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हेमप्रभू मुंगणकर सर यांनी केले.

