
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली दि. १३ जुलै : शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुनी वडसा येथे गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. डॉ. नामदेवजी किरसान यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी आमदार रामदासजी मसराम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्वखर्चातून स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट देत शिक्षणाबद्दलची आपली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी, कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करणे, स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने उभारण्यात आलेली ही अभ्यासिका भविष्यात अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस कमिटी देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, नगराध्यक्षा सौ. लताताई सौंदरकर, नगर परिषद उपाध्यक्ष नरेश विठलानी, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, नगरसेवक तथा गटनेते विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके, पाणीपुरवठा सभापती सचिन खरखाटे, नगरसेवक विलास लोखंडे, नगरसेविका मंदा समर्थ, नगरसेविका फैमिदा पठाण, नगरसेविका लता मुळे, प्रकाश समर्थ, मुरलीधर सौंदरकर, हंसराज लांडगे, सागर वाढई, कैलास वानखेडे, अश्विन मुळे, राजू मेश्राम, योगेश नेवारे, हाके सर, मस्के सर, देशपांडे मॅडम, विजय मुळे, प्रशांत मुळे तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षण हाच विकासाचा भक्कम पाया असून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणे हीच खरी समाजसेवा आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

