
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षकांनी केलेले समर्पित कार्य निश्चितच प्रेरणादायी असून, शिक्षक हे समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष वामनरावजी फाये यांनी केले.
ते श्रीराम विद्यालय, कोरची येथे कार्यरत असलेल्या सुषमा खोब्रागडे (गजभिये) मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम श्रीराम विद्यालय, कोरचीच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव दोषहर फाये, गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य चांगदेव फाये, श्रीराम विद्यालय, कुरखेडाचे प्राचार्य नागेश फाये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवराव गजभिये, शाळा समिती सदस्य वर्षाताई फाये, तसेच श्रीराम विद्यालय, कोरचीचे प्राचार्य नंदुजी गोबाडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी चांगदेव फाये, देवराव गजभिये, नागेश फाये आणि नंदुजी गोबाडे यांनी मनोगत व्यक्त करत सुषमा गजभिये मॅडम यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
सत्कारमूर्ती सुषमा खोब्रागडे (गजभिये) मॅडम यांनी आपल्या मनोगतात संस्थेने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या संस्थेमुळेच विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सुषमा खोब्रागडे (गजभिये) मॅडम यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ठाकरे सर यांनी केले. भुसारी सर यांनी प्रास्ताविक सादर केले, तर मेश्राम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम विद्यालय, कोरचीचे प्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

