
सुदैवाने विद्यार्थी व प्रवासी सुरक्षित; खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला?

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली :चामोर्शी–चाकलपेठ मार्गावरून प्रवास करणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसचा टायर फुटल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी व इतर प्रवासी सुदैवाने सुरक्षित असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानव विकास मिशनची बस चामोर्शी–चाकलपेठ मार्गावरून जात असताना अचानक बसचा टायर फुटला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील विद्यार्थी व प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने सर्वजण सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
खराब रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त; प्रशासनाने दखल घेण्याची मागणी!
चामोर्शी–चाकलपेठ मार्गाची अवस्था खराब असल्यानेच बसचा टायर फुटल्याची चर्चा प्रवासी व विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे आणि खराब पृष्ठभागामुळे वाहनचालकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रवासी व विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे.
मानव विकास मिशनच्या बसमधून अनेक विद्यार्थी प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्यांची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भविष्यात अशा घटनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित विभागाने चामोर्शी–चाकलपेठ मार्गाची तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

